Ladki Bahin Yojana : बार्शी तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे २२ अर्ज ऑनलाइन पोर्टलवर दाखल करण्यात आले असून, या अर्जांसाठी दाखल केलेली बँक खाती उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील असल्याचे उघड झाले आहे.
अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
यासंदर्भात अज्ञात व्यक्तींविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बार्शी तालुका पंचायत समितीतील ग्रामीण महिला व बाल विकास अधिकारी रेशमा पठाण यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी एकूण ८५ हजार अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची पडताळणी करून बहुसंख्य अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये अनुदान दिले जात आहे. मात्र, २२ अर्ज तपासताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत.
बनावट कागतपत्रे अढळून आले आहेत
या अर्जांसाठी आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. तपासात असेही दिसून आले की, अर्जदारांच्या नावावर नमूद करण्यात आलेल्या काही महिलांचे अस्तित्वच नाही. अर्जांसोबत जोडलेली बँक खाती इतर राज्यांतील असल्याचे आढळून आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेत शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.